- घंटागाडी कामगारांना कायम करण्याच्या उपसूचनेलादेखील मान्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७. ऑगस्ट. २०२०) :- यशंवतराव स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील पदव्युत्तर संस्थेसाठी (पी.जी. इन्स्टिट्यूट) विविध ४८ तज्ज्ञ डॉक्टरांच्या नियुक्तीस बुधवारी (दि. २६) अखेर मंजुरी देण्यात आली. तसेच, तात्पुरत्या स्वरूपात काम करणारे २० डॉक्टर, कोरोना रुग्णांसाठी काम करणारे वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (परिचारिका), पॅरामेडिकल कर्मचारी, सुरक्षा निरीक्षक, रुग्णवाहिका वाहनचालक व वर्ग चारचे कर्मचारी तसेच, घंटागाडी कामगारांना कायम करण्याच्या उपसूचनेला मान्यता देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या.
डॉक्टरांच्या नियुक्तीवरून शुक्रवार (दि. २१) सभेत चर्चा रंगली होती. त्यांनंतर गटनेत्यांची बैठक घेऊन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नियुक्तीची सविस्तर माहिती दिली. त्यामुळे सभेत यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश बहल, मंगला कदम व अजित गव्हाणे यांनी सत्ताधारी भाजपवर कडवट टीका केली. बहल यांनी सत्ताधाऱ्यांना अझजल खानाची उपमा दिली. वायसीएममध्ये कायम डॉक्टर नेमण्याचा हट्टहास का केला जात आहे. नियुक्तीमागे प्रत्येकी ४० लाख रुपये घेतले असून, गणसंख्या नसताना हा विषय मंजूर केल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजपचे बाळासाहेब ओव्हाळ यांनी बहल यांच्या टीकेस सडतोड उत्तर दिले. माजी पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांना कायम करण्याचा राज्य शासनाचे निर्देश आहेत. पीजीमुळे अधिक चांगली आरोग्य सुविधा मिळणार आहे. शिवेसेनेचे गटनेते राहुल कलाटे म्हणाले की, आयुक्तांनी पूर्वीच खुलासा केला असता तर, नाहक चर्चा झाली नसती. सत्ताधाऱ्यांनी शंकेला वाव देऊ नये. नियमानुसार कार्यवाही करा. कायम केल्यानंतर डॉक्टरांनी मुजोरी करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले की, गटनेत्यांची बैठक घेऊन नियुक्तीबाबत माहिती दिली आहे. सभागृहात सर्वांना बोलण्याची संधी दिली जाते. पीजीमुळे शहराच्या नावलौकीकात भर पडली आहे. सभेत प्रभागातील समस्या मांडतो. मूर्ख आहोत म्हणून बोलत नाही, असे आशा शेंडगे म्हणाल्या. केलेल्या नियुक्त्या न्यायालयात टिकल्या पाहिजेत, असे मत सीमा सावळे यांनी व्यक्त केले.


















