- भाजपाच्या तत्कालीन मंत्र्यांनाही पुरविले पैसे; नगरसेवक योगेश बहल यांचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७. ऑगस्ट. २०२०) :- महापौर या जिजाऊ आहेत, मात्र सत्ताधारी भाजपातील नगरसेवक हे अफजल खानाच्या पिल्लावळी आहेत. या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टरांचा विषय मंजूर करण्यासाठी ५० लाख रुपये घेतले आहेत. त्यांनी भाजपाच्या तात्कालीन मंत्र्यांनाही पैसे पुरविले आहेत. त्यामुळे डॉक्टरांना कायम करण्याचा विषय एवढ्या घाईत मंजूर करून घेतला, असा आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी बुधवारी झालेल्या महासभेत केला.
तसेच यावेळी त्यांनी ‘अफजलखान, अफजलखान’ अशा घोषणा देत महापौरांच्या डायससमोर धाव घेतल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला होता. महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत वायसीएम रुग्णालयातील पदव्युत्तर संस्थेकरीता नियुक्त करण्यात आलेल्या अध्यापकांना कायम सेवेत समाविष्ट करण्याचा विषय आजच्या सर्वसाधारण सभेसमोर होता. यावरून बहल यांनी हा आरोप केला.
यावेळी नगरसेवक बहल म्हणाले, महापौर तुम्ही आमच्यासाठी जिजाऊ आहात तुमच्याकडून अशा पद्धतीने सभागृह चालविण्याची अपेक्षा नाही. या विषयाला अनेक नगरसेवकांचा विरोध आहे. त्यामुळेच सभागृहामध्ये फक्त एकाच आमदाराच्या गटाचे नगरसेवक उपस्थित आहेत. भोसरी मतदारसंघातील नगरसेवक उपस्थित नाही. वायसीएम रुग्णालय या डॉक्टरांच्या ताब्यात गेल्यावर त्या ठिकाणी धंदा सुरू होणार आहे. तुमच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकी एका डॉक्टरकडून ५० लाख रुपये घेतले आहेत. हे उघड होऊ नये, यासाठी तुम्ही घाईने विषय मंजूर करून घेतला, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
सभागृह नियमानुसार चालविले जात नसल्याचा आरोप विरोधी पक्षासोबत सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनीही केला. नगरसेविका आशा शेंडगे म्हणाल्या, आपण विषय मंजूर करून घेण्याची घाई का करतोय. यामुळे शंकेला संधी मिळत आहे. येथे विचारांची देवाणघेवाण करण्यासाठीचे हे पवित्र मंदिर आहे. त्यामुळे आम्हाला बोलू द्या. तर नगरसेवक अभिषेक बारणे म्हणाले, आयुक्तांनी या सगळ्या विषयावर खुलासा करणे आवश्यक आहे. त्यानंतर काही शंका असेल तर बोलणे योग्य आहे. त्यासाठी महापौरांनी आयुक्तांना खुलासा करण्याचे आदेश द्यावे. नाहीतर ही वायफळ चर्चा कितीही चालेल.
दरम्यान पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या गटाचे नगरसेवक गैरहजर होते. त्यामुळे उलटसुलट चर्चा रंगली होती. स्थायी समिती सभेत काही विषयांना मंजुरी देण्यावरून आ. लांडगे व आ. जगताप गटात गेल्या काही दिवसांपासून वाद रंगत आहे. त्यावरून दोन्ही गटात फूट पडल्याचे चित्र आहे.


















