कोरोना चाचणीत तफावत; रुग्णांचे हाल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. ऑगस्ट. २०२०) :- बिजलीनगर येथील ५८ वर्षीय रुग्णाला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यामुळे चिंचवडगाव येथील तालेरा रुग्णालय येथे ते करोना तपासणीसाठी १४ ऑगस्ट रोजी गेले होते. त्या वेळी डॉक्टरांनी त्यांची रॅपीड अँटीजेन टेस्ट घेऊन त्यांना घरी जाण्यास सांगितले. वाय.सी.एम. रुग्णालयात करोनाची चाचणी करण्यात आली.
संबंधित रुग्णाला १९ तारखेला श्वास घेण्यासाठी जास्त त्रास होऊ लागला. त्यामुळे पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. मात्र, तेथे उपचारासाठी पूर्ण पैसे उपलब्ध नसल्याने त्यांना वाय.सी.एम. रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे त्यांची करोनाची चाचणी करण्यात आली. तसेच, त्यांना रुग्णालयात दाखल केले.२२ ऑगस्टला सकाळी त्यांच्या करोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना वायसीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांनी घरी जाण्याची परवानगी दिली. मात्र, त्याच दिवशी दुपारी बाराच्या सुमारास तालेरा रुग्णालयाचे काही कर्मचारी त्यांच्या घरी गेले. तसेच, संबंधित रुग्णाला करोनाची लागण झाली असून त्यांना उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे सांगितले.
तालेरा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी पॉझिटिव्ह रिपोर्ट देण्यासाठी एवढा विलंब का लावला? यामध्ये डॉक्टरांचा हलगर्जीपण दिसून येत आहे. संबंधित घटनेची तपासणी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावी. तसेच, यामध्ये हलगर्जीपणा करणारे अधिकारी / डॉक्टरांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी आरोग्यविभाग तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष अॅड. सागर चरण यांनी केली आहे.














