- हिम्मत असेल तर, आरोपाचे खंडन करा; कलाटे यांचे आ. जगतापांना खुले आव्हान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. ऑगस्ट. २०२०) :-शहरात विकासकामे करत असल्याचा आव आणणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा गुरुवारी झालेल्या स्थायी समितीमध्ये उघडा पडला असून विकसनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये गोळा करूनही वाकड, ताथवडे, पुनावळे परिसरातील विकास कामांना खो घालण्यात येत आहे. केवळ राजकीय आकसापोटी सुरू असलेल्या प्रकाराबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांनी जाहीर खुलासा करावा, असे आव्हानच शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी दिले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेची गुरुवारी स्थायी समिती सभा झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती संतोष लोंढे होते. स्थायीच्या विषय पत्रिकेवरील एक आणि दोन ही प्रभाग क्रमांक २५ मधील जीवननगर येथून मुंबई – पुणे हायवेकडे जाणा-या २४ मीटर डीपी रस्ता, प्रभागातील आवश्यकतेनुसार सिमेंट काँक्रिट रस्त्यांची कामे करण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. यावेळी मतदान घेण्यात आले. त्यात प्रस्तावाच्या विरोधात १० आणि बाजूने ५ मते पडली. त्यावरुन स्थायीच्या भाजप आणि शिवसेना – राष्ट्रवादी सदस्यांमध्ये तू – तू – मैं – मैं झाले. त्यामुळे प्रत्येक विषयावर मतदान घेण्याची मागणी राहुल कलाटे यांनी केल्याने सभापती लोंढे यांनी सभा तहकूब केली.
यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कलाटे म्हणाले, महापालिकेला माझ्या प्रभागातून कोट्यवधी रुपयाचा कर मिळतो. त्या बदल्यात तेथील नागरिकांना पायाभूत सोयी – सुविधा उपलब्ध करुन देणे ही माझी व महापालिकेची जबाबदारी आहे. परंतु, भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हट्टापायी स्थायी समितीत प्रभाग क्रमांक २५ मधील प्रत्येक विकास कामांना अडथळा घालण्याचे काम त्यांचे अनुयायी करीत आहेत. त्यामुळेच प्रभागातील रस्त्यांच्या कामाचे विषय आज स्थायी सभापतींनी फेटाळले. याला विधानसभा निवडणुकीची झालर असून ते विकासकामांना अडथळे आणत आहेत. वाकड प्रभागातील जनतेला सुविधा देण्यास अडथळा आणणे हे योग्य नाही. तसेच वाकड, पुनावळे, ताथवडे परिसरातील विकास कामांना आमदार जगताप यांचा का विरोध आहे? हे त्यांनी भाजपच्या वतीने हिम्मत असेल तर जाहीर खुलासा करावा, त्यावेळी आम्हीदेखील जनतेची भूमिका मांडण्यासाठी उपस्थित राहू.
विधानसभा निवडणुकीत केवळ मोदी लाटेमुळे ते दोनवेळा विजयी झाले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही त्यांना भाजपाचा आणि मोदी लाटेचा फायदा झाल्याने थोड्या मताने ते विजयी झाले. त्यामुळे त्यांना आता पाण्यात देखील माझीच प्रतिमा दिसू लागलीय. लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलीय, असेही कलाटे म्हणाले.














