न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरातील एका युट्यूब चॅनलवर ‘खंडणीखोर नगरसेविका’ या मथळ्याखाली एक पोस्ट होती. ती पोस्ट फिर्यादी यांनी २५ ऑगस्ट रोजी त्यांच्या फेसबुकवर टाकली. त्याचा राग मनात धरून भाजप नगरसेविका आणि आणखी एकाच्या सांगण्यावरून आरोपीने फिर्यादीच्या इंद्रायणीनगर येथील रॉयल फास्ट फूड या हॉटेलमध्ये येऊन फिर्यादी यांच्या वडिलांना शिवीगाळ व मारहाण केली.
त्यानंतर जबरदस्तीने फिर्यादी यांच्या हॉटेलमधील ३ हजार १२० रुपयांची रोकड आरोपींनी चोरून नेली. आरोपींनी फिर्यादी यांनाही मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निलेश उर्फ गज्या भीमराव पवार (वय ३०, रा. दिघी), सागर उर्फ सिद्धुधन शिवलिंग भोसले (वय ३२, रा. भोसरी), विशाल भीमराव हाके (वय ३०, रा. मोशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महेंद्र लक्ष्मण सरवदे (वय ३२, रा. भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार २५ ऑगस्ट रोजी रात्री साडेसात वाजता इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडला. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.














