न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९. ऑगस्ट. २०२०) :- पवना धरण क्षेत्रात शुक्रवारी (दि. २८) पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढल्याने पवना धरणातील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. ३१ जुलैपर्यंत धरणात ३३.६० टक्के पाणीसाठा होता.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने चांगला जोर धरला. मागील २४ तासात धरण क्षेत्रात ३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरणात १.८९ टक्के पाणीसाठा वाढला आहे. यामुळे सध्या पवना धरण ९४.४४ टक्के भरले आहे.
त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने पवना धरण लवकरच भरेल असे सांगण्यात आले आहे. तसेच, १०० टक्के पवना धरण भरल्यास धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.














