न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१. ऑगस्ट. २०२०) :- ‘ गे ‘ अॅपवर झालेल्या ओळखीचा फटका तरुणाला बसला. संबंधीत तरुणाला ऑनलाइन मित्राने संबंधासाठी बोलावून तिघांच्या सहाय्याने तलवारीचा धाक दाखवत लुटले. ही घटना नांदेड फाटा रस्त्यावर घडली. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
फिर्यादी तरुण दि. ९ ऑगस्ट रोजी ‘ग्राइंडर गे’ नावाच्या अॅपवर चॅटिंग करत असताना त्याला रवी नावाच्या एकाने हाय मेसेज पाठविला. त्यानंतर फिर्यादीने त्याला कोठे आहे, अशी विचारणा केली. त्यावर रवीने डीएसके विश्व रस्त्यावर असल्याचे सांगितले. त्यानंतर साडेअकराच्या सुमारास फिर्यादी डीएसके रस्त्यावर गेला. तेथे त्याला रवी नावाचा तरुण भेटला. त्यानंतर तो त्याला त्याच्या रूमवर घेऊन गेला. दरम्यान, दोघांचा समलैंगिक प्रकार सुरू होणार इतक्यात तिघे तलवार, काठ्या घेऊन त्यांच्या खोलीत शिरले. त्यांनी फिर्यादीला मारहाण करून तलवारीचा धाक दाखविला.
त्यानंतर घाबरलेल्या फिर्यादीजवळील रोख १० हजार रुपये, सोन्याच्या दोन अंगठ्या, चांदीच्या दोन अंगठ्या काढून घेतल्या, तसेच गुगल पेद्वारे व एटीएमचा पिननंबर जबरदस्तीने घेऊन एटीएममधूनही पैसे काढले. त्याच्याकडून एकूण ८१ हजार रुपयांचा ऐवज लुटला. घटना घडल्यानंतर फिर्यादी प्रचंड घाबरला होता. घरच्यांना कळल्यानंतर संसार मोडेल या भीतीने फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार दिली नव्हती. परंतु ही बाब त्याने आपल्या मित्राला सांगितल्यानंतर मित्राने पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. या प्रकरणात कट रचून (भादंवि कलम १२० ब) मारहाण करून लुटल्याप्रकरणी (भादवि कलम ३९४) गुन्हा दाखल झाला आहे.














