- पालिकेने अपुऱ्या मनुष्यबळाअभावी घेतला निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवडच्या ऑटो क्लस्टरच्या प्रदर्शन हॉलमध्ये कोरोना रूग्णालय सुरू करण्यात आले आहे. या रूग्णालयातील ५० बेडचे आयसीयू विभाग आणि ऑक्सिजनयुक्त १५० बेडचे संचलन जबाबदारी खासगी रूग्णालयाकडे देण्यात येणार आहे. तीन महिने कालावधीसाठी ५ कोटी ५३ लाख ५० हजार रूपये खर्च अपेक्षित आहे.
शहरात कोरोनाबाधित रूग्ण वाढत असल्याने पालिका प्रशासनाने ऑटो क्लस्टर येथे २०० बेडचे तात्पुरते रूग्णालय सुरू केले आहे. हे रूग्णालय पालिका स्पर्श रूग्णालयास चालविण्यास देणार आहे. आयसीयू विभागातील एका बेडसाठी प्रति दिन ६ हजार ४५० रूपये आणि ऑक्सिजनयुक्त बेडच्या प्रत्येक बेडसाठी प्रति दिन १ हजार ९५० रूपये खर्च आहे. या दराने रूग्णालय स्पर्श रूग्णालयास ३ महिने म्हणजे ९० दिवसांसाठी देण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण ५ कोटी ५३ लाख ५० हजार रूपये पालिका खर्च करणार आहे.
महापालिकेने १५ पेक्षा अधिक कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. महापालिकेचे मनुष्यबळ त्यात अडकून पडत असल्याने नियमित कामासाठी मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने सर्व कोविड केअर सेंटर खासगी रूग्णालये व संस्थांना चालविण्यास दिले आहेत. नव्याने तयार झालेले भोसरीतील बालनगरी कोविड केअर सेंटरही संचलनासाठी खासगी संस्थेला दिले जाणार आहे. तसेच, तात्पुरते रूग्णालय खासगी संस्थेला दिले जात आहेत. दरम्यान, राज्य शासनाने उभारेल्या नेहरूनगर, पिंपरी येथील ऑक्सिजनयुक्त ८०० बेडच्या कोरोना जम्बो रूग्णालयही खासगी संस्थेला देण्यात आले आहे.














