न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१. ऑगस्ट. २०२०) :- चिंचवड-काळेवाडी रस्त्यावरील चितराव गणपती मंदिराजवळ असलेल्या खुशबू हॉटेलच्या मागे रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास चौघेजण दारू पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. किरकोळ वादातून चिढलेल्या आरोपींनी बाजूला पडलेले वॉश बेसिन तरुणाच्या डोक्यात मारले. तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला.
ही घटना रविवारी (दि. ३०) रात्री चिंचवड येथे घडली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले आणि वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळेवाडी पोलीस चौकीत स्वतःहून हजर झाले. आरोपींनी घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली.
शुभम रणजित साठे (वय २१, एकता हौसिंग सोसायटी, थेरगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. कृष्णा कापुरे (वय १९), अजय क्षीरसागर (वय २०) आणि ज्ञानेश्वर थोरात (वय २०, तिघेही रा. समता कॉलनी, थेरगाव) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर काळेवाडी चौकीतील पोलिसांनी त्यांना चिंचवड पोलिसांच्या ताब्यात दिले. चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.














