न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१. ऑगस्ट. २०२०) :- अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून, नियमित पहिल्या प्रवेश फेरीची गुणवत्ता यादी रविवारी (दि. ३०) जाहीर करण्यात आली. यात कला, वाणिज्य, विज्ञान आणि एचएसव्हीसी या शाखेतील अभ्यासक्रमासाठी ४० हजार १३ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीतून प्रवेश देण्यात आला. अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी यावर्षी ७३ हजार ६८५ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. त्यातील ६८ हजार ७२ अर्ज पात्र ठरले आहेत. पहिल्या फेरीत २८ हजार ५९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकलेला नाही.
पहिल्या फेरीत सुमारे १९ हजार ५७५ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले तर, जवळपास सहा हजार ७०२ विद्यार्थ्यांना त्यांच्या दुसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे. तिसऱ्या पसंतीक्रमानुसार ४ हजार १७४, चौथ्या पसंतीक्रनानुसार २ हजार ८४०, पाचव्या पंसतीने २ हजार १३८, सहाव्या पसंतीने १ हजार ५०३, सातव्या पसंतीने १ हजार ६६, आठव्या पसंतीने ८४४, नवव्या पसंतीने ६२९, दहाव्या पसंतीनुसार ५४२ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालय मिळाले.
शिक्षण विभागाने दिलेल्या वेळापत्रकानुसार इयत्ता अकरावीच्या केंद्रीय प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना सोमवारी (दि. ३१) सकाळी दहा वाजल्यापासून गुरूवारी (दि. ३) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रवेश घेता येणार आहेत. लोग इनमध्ये प्रवेशासाठी मिळालेले महाविद्यालय दर्शविले आहे. त्याचप्रमाणे प्रवेशाबाबत मोबाईल संदेश पाठविण्यात आला आहे. तसेच पहिल्या नियमित फेरीचे कट ऑफ संकेतस्थळावर प्रसिध्द केले असून संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी त्यांच्या लॉगइनमध्ये पाठवली आहे, असे अकरावी ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव शेंडकर यांनी सांगितले.














