न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. २८ नोव्हें) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने मंगळवार (दि. २७) रोजी कुदळवाडीतील पिं. चिं. म. न. पा. प्राथमिक शाळा क्र ८९ मध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात आली. स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांच्या हस्ते लहान बालकांना लस देऊन या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी स्वी. नगरसेवक दिनेश यादव, किशोर लोंढे, मुख्याध्यापक सगभोर, पोटघन, खामकर, बगाटे आदी शिक्षक उपस्थित होते. डॉ. संगीता तेलंगी, डॉ. मीनल पंचभाई व मदतनीस लता माळी यांनी लसीकरण केले.
नगरसेवक दिनेश यादव म्हणाले, “रोग प्रतिकार शक्ती कमी असल्याने लहान मुले क्षयरोग, पोलिओ, धनुर्वात, घटसर्प, डांग्या खोकला, गोवर, रूबेला, हिमोफिलीयस एन्फ्लुएंझा ब, मेंदुज्वर, न्युमोनिया या प्रकारच्या आजारांना बळी पडतात. बालवयात होणारे रोग टाळण्याच्या सर्वात प्रभावी मार्गांपैकी एक म्हणजे लसीकरण. कोणताही रोग होण्याअगोदर त्यास प्रतिबंध करणे हाच खरा उपाय असतो. त्यामुळेच महापालिकेने सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. लसीकरणाद्वारे गोवर रोगाचे उच्चाटन व रूबेला रोगावर नियंत्रण ठेवण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. हा अत्यंत संक्रामक, घातक व विषाणूजन्य आजार जो मुख्यत: मुलांना होतो. केवळ ९ महिने (पूर्ण) ते १५ वर्षे वयोगटातील बालकांना गोवर व रूबेला प्रतिबंधक लसीची एक मात्रा दिल्यास गोवर रूबेलाची बाधा होण्याची शक्यताच उरत नाही. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन यादव यांनी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना केले.










