- समाविष्ट गावातील पहिल्या टाउन हॉलचे भूमिपूजन!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१. ऑगस्ट. २०२०) :- समाविष्ट गावांतील नागरिकांसाठी पायाभूत सोयी-सुविधा उलब्ध करुन देणार, असा शब्द आमदार महेश लांडगे यांनी दिला होता, त्याला पूर्ण करण्यासाठी प्रत्येक प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात येत असल्याची माहिती नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी दिली. समाविष्ट गावांसाठी केलेल्या कार्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत आणि आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक १ चिखली येथे टाउन हॉल विकसित करण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन सोमवारी सकाळी करण्यात आले.
यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, सभागृह नेते नामदेव ढाके, नगरसेवक कुंदन गायकवाड, नगरसेविका स्वीनल म्हेत्रे, नगरसेविका साधना मळेकर, नगरसेविका योगिता नागरगोजे, स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव, संतोष मोरे यांसह माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, अमृत सोनवणे, संदीप शेलार, पांडाभाऊ साने, गणेश मळेकर, भोसरी चऱ्होली मंडल क्रिडा सांस्कृतिक चिटणीस सुनील लांडे, युवराज पवार, योगेश सोनवणे, नवीन बग, दत्तात्रय मोरे, फ क्षेत्रीय पालिका अधिकारी आणि चिखली ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, भोसरी व्हीजन-२०२० अभियानांतर्गत आम्ही अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. समाविष्ट गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
नगरसेवक गायकवाड म्हणाले, या टॉऊनहॉलमुळे चिखलीतील नागरिकांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय उपक्रम घेता येणार आहेत. सुसज्ज हॉलमध्ये तरूणांसाठी जीम ची व्यवस्था कऱण्यात आली आहे. या हॉलच्या माध्यमातून महापालिकेला चांगले उत्पन्न मिळणार आहे.
कसा असेल टाउन हॉल..?
प्रभाग क्रमांक १, चिखली येथील आरक्षण क्रमांक १/९६ या ठिकाणी टाउन हॉल विकसित करण्यात येत आहे. दोन मजली इमारत असून, दुसरा मजला सुमारे ५५० चौ. मी. इतका असेल. पुरूष व महिलांसाठी अद्ययावत जीम, कार्यालय, स्टोरेज रुम विकसित करण्यात येणार आहे. सुमारे २ हजार ७९ चौ. मी. परिसरात टाउन हॉल उभारण्यात येईल. बेसमेंट पार्किंगसाठी ६.० मी. रुंद रँप, ट्रान्फार्मर, रुम, प्रवेशद्वार, मोकळ्या जागेवर प्रशस्त हिरवळ, क्यॅफे, कलाशिल्प, पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण इमारतीच्या दर्शनी भागात लँडस्केप व बाजूने फुलझाडे, पेव्हड वाहन मार्ग इत्यादी सुविधा करण्यात येणार आहे. सुमारे ३० कोटी ६० लाख ८७ हजार १४८ रुपयांचा खर्च करण्यात येणार असल्याची माहिती, नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी दिली.














