न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१. सप्टेंबर. २०२०) :- शहरातील विविध घाटांवर गणेश विसर्जन सोहळ्यानिमित्त पोलिस व महापालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मंगळवारी (दि. १) अनंत चतुर्दशी असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घाटांवर श्रींची मूर्ती विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. महापालिका व स्वयंसेवी संस्थाच्या वतीने परिसरात दहा फिरत्या वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, क्षेत्रीय कार्यालयांतर्गत छोटी वाहने पुरविण्यात आली आहेत.
निर्माल्याचे संकलनही करण्यात येणार आहे. कोरोना महामारीमुळे गणेशोत्सव व विसर्जन सोहळा साध्या पद्धतीने करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्या अनुषंगाने घाटावरील गर्दी टाळण्यासाठी घाट परिसर पत्रे लावून बंद करण्यात आले आहेत. अनंत चतुर्दशीनिमित्ताने विविध परिसरातून मंडळे घाटावर येणार आहेत. त्यानुसार घाट परिसरात पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पिंपरी – चिंचवड महापालिकेचे आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान, पिंपरी, चिंचवड, थेरगाव, निगडी या घाटावर मूर्तीदान उपक्रम राबवला आहे. तसेच महापालिकेतर्फे दहा वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात वाहने उपलब्ध असून प्रत्येक चौकात कृत्रिम हौद ठेवण्यात आला आहे.














