- अॅड. राजेश पुणेकर यांची सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिका-यांकडे धाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१. सप्टेंबर. २०२०) :- कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने दि. २३ मार्च २०२० पासून शासनाच्या आदेशाप्रमाणे दुय्यम निबंधक कार्याल व दस्त नोंदणी प्रक्रिया बंद असल्याने सर्व नागरिक व पक्षकारांचे व्यवहार रखडले आहेत. त्यामुळे पिं.चिं. अॅड. बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. राजेश पुणेकर यांनी मा. सह जिल्हा निबंधक वर्ग -१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे यांची भेट घेऊन त्यांना समस्यांचे निवेदन सादर केले. यावेळी अॅड. राजेश पुणेकर यांचेसोबत अॅड. गणेश शिंदे हे देखील उपस्थित होते.
या निवेदनामध्ये अॅड. राजेश पुणेकर यांनी म्हटले आहे की, कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने दि. २३ मार्च २०२० पासून शासनाचे आदेशाप्रमाणे दुय्यम निबंधक कार्याल व दस्त नोंदणी प्रक्रिया बंद करणेत आली होती. दुय्यम निबंधक कार्याल व दस्त नोंदणी प्रक्रिया बंद होणार असल्याबाबत कोणासही पूर्वकल्पना नव्हती. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालय व दस्त नोंदणी प्रक्रिया बंद होण्यापूर्वी एडीएम ठेवलेल्या दस्ताची मुदत जेवढया कालावधीकरिता दस्त नोंदणी प्रक्रिया बंद आहे, तेवढया कालावधीकरिता वाढविण्यात यावी.
तसेच दुय्यम निबंधक कार्याल व दस्त नोंदणी प्रक्रिया बंद होण्यापूर्वी ज्या दस्तास पक्षकारांनी मुद्रांकशुल्क व नोंदणी फी भरलेली आहे व दस्त नोंदविले गेले नाहीत, त्याची देखील मुदत दस्त नोंदणी प्रक्रिया बंद आहे. तेवढया कालावधीकरिता वाढविण्यात यावी. याबाबत यापूर्वी देखील मा. सह जिल्हा निबंधक यांना विनंती केली होती. परंतु दुय्यम निबंधक कार्यालये चालू होऊनदेखील एडीएम दस्ताची व भरलेल्या मुद्रांक शुल्काची मुदत वाढविणेबाबत कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे लाखो रुपये मुद्रांक भरलेले दस्त रद्द होत असून नागरिकांना मोठी आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.
अॅड. राजेश पुणेकर यांनी दुय्यम निबंधक कार्यालयातील अपुरी जागा, वकील व पक्षकारांच्या अडचणी अशा विविध विषयांवर सह जिल्हा निबंधक कोळेकर यांच्या बरोबर चर्चा केली. यावेळी सह जिल्हा निबंधक कोळेकर यांनी या विषयाबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले.














