न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१. सप्टेंबर. २०२०) :- काळेवाडीतील ज्योतीबानगरमधील आझाद मित्र मंडळ स्पोर्ट्स क्लबच्या वतीने साधेपणाने व विविध कार्यक्रमांनी गणेशोत्सव साजरा करण्यात आला. यंदाच्या वर्षापासून मंडळाने पर्यावरणपूरक गणपती मूर्ती बसवण्याचा संकल्प केला. त्या प्रमाणे शाडू मातीच्या मूर्तीची स्थापना मंडळाचे संस्थापक अध्यक्ष काळूराम नढे व संस्थापक उपाध्यक्ष स्वीकृत नगरसेवक विनोद तापकीर यांच्या हस्ते करण्यात आली.
मंडळाच्यावतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्यामध्ये मंडळाच्या २५ कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. या वर्षी मंडळाच्या वतीने दररोज विविध क्षेत्रातील कोरोना योद्धा जसे की डॉक्टर, नर्स, मेडिकल चालक, पोलीस, सफाई कामगार, माजी सैनिक तसेच कोरोना च्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या हस्ते आरती करण्यात आली व त्यांचा तुळशीचे रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. मंडळाच्या वतीने गरजूंना अन्न-धान्य वाटप करण्यात आले. परिसरातील नागरिकांना गणपती मूर्ती चे विसर्जन करण्याकरिता मंडळाच्या वतीने विसर्जन हौदाची व्यवस्था करण्यात आली. मंडळाच्या गणपतीचे विसर्जन ९ व्या दिवशी मंदिरातच करण्यात आले.
या सर्व कार्यक्रमाची संकल्पना मंडळाचे संस्थापक अध्यक्ष काळूराम नढे यांची होती व त्यांना सहकार्य मंडळाचे अध्यक्ष अतुल नढे, राजू शिंदे, शाम नढे, गजानन नढे, प्रमोद मोरे, खंडू आव्हाड, बजरंग नढे, अमोल नढे, महेश शिंदे, युवराज नढे आदींनी केले.














