न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. सप्टेंबर. २०२०) :- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे आयुक्त म्हणून भारतीय पोलिस सेवेतील कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश गृह विभागाकडून काढण्यात आले. मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बुधवारी राज्यातील ४५ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. कृष्ण प्रकाश पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे तिसरे आयुक्त ठरणार आहेत.
१५ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय सुरू झाले. या आयुक्तालयाचे पहिले पोलिस आयुक्त म्हणून आर. के. पद्मनाभन यांनी पदभार घेतला. विधानसभा निवडणुका असल्याने सेवानिवृत्तीपूर्वी एक महिनाआधी त्यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर दुसरे आयुक्त म्हणून काम पाहणारे संदीप बिष्णोई यांची बदली करण्यात आली होती. आता बिष्णोई यांच्या जागेवर तिसरे आयुक्त म्हणून कृष्णप्रकाश यांची नियुक्ती झाली आहे.
ते १९९८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात महत्त्वाची पदं सांभाळली आहेत. त्यांची २०१२ मध्ये मुंबईत अतिरिक्त आयुक्त, दक्षिण विभाग म्हणून बदली झाली होती. त्यांनी जागतिक स्तरावरील तीन खडतर टप्प्यांची आव्हानात्मक ‘आयर्नमॅन ट्रायथलॉन रेस’ स्पर्धा विक्रमी वेळेत पूर्ण करून जगभरात देशाचे आणि पोलिसांचे नाव सुवर्णाक्षरांत कोरले आहे.














