- अखेर लाच भोवली; खातेनिहाय चौकशीचे आयुक्तांकडून आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. सप्टेंबर. २०२०) :- वैद्यकीय विभागासाठी साहित्य पुरविणाऱ्या ठेकेदाराने पिंपरी चिंचवड महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, कनिष्ठ अभियंता सुनील बेळगावकर, बायोमेडिकल इंजिनिअर सुनील लोंढे या तीन अधिकाऱ्यांच्या बँक खात्यावर लाखो रुपयांची रक्कम दिली होती. विशेष म्हणजे ही रक्कम संबंधित ठेकेदाराने आपल्या आयकर विवरणपत्रातही दाखविली होती. आयुक्तांनी या प्रकरणी पालिकेच्या या तीन अधिकाऱ्यांवर कारवाई केली असून खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांचे पूर्ण आर्थिक अधिकार काढून घेतले आहेत.
अनियिमित निविदा प्रक्रियेची माहिती घेताना तुषार कामठे यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी ४ जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत या प्रकरणी आवाज उठविला होता. तसेच पुरावे सादर केले होते. यानंतर आयुक्तांनी १५ दिवसांत चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी घोषणा केली होती.
अधिकाऱ्यांनी घेतलेली लाच हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. या अधिकाऱ्यांना महापालिकेतून बडतर्फ करावे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, ज्या ठेकेदारांशी संगणमत करून त्यांनी हा प्रकार केला त्यांच्यावरही गुन्हे दाखल करून त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी नगरसेवक तुषार कामठे यांनी केली होती. मात्र, आयुक्तांनी केवळ जुजबी कारवाई करीत एकप्रकारे दुजाभाव दाखविला आहे.
आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, श्री कन्स्ट्रक्शन या महापालिकेकडील नोंदणीकृत ठेकेदाराकडून रॉय यांनी रक्कम घेतल्याचे सूचित होत आहे. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ मधील नियम ४ (१९) चा रॉय यांनी भंग केला आहे. तसेच त्यांनी त्यांचा मुलगा व्यवसाय करत असतानाही महापालिकेला कळविलेले नाही. या दोन्ही बाबी अपराधिक स्वरुपाच्या असून, त्यांनी सचोटी आणि कर्तव्यात कसूर केल्याचे सिद्ध होत आहे. नागरी सेवा नियमांच्या विविध कलमांचा त्यांनी भंग केल्यामुळे तसेच स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पदाचा दुरुपयोग करून गंभीर स्वरुपाचे गैरवर्तन केले आहे. त्यांनी केलेल्या या वर्तनामुळे महापालिकेचीही बदनामी झाली आहे. त्यामुळे त्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश मी पारित करीत आहे.














