- पिंपरी-चिंचवड नूतन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६. सप्टेंबर. २०२०) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदाचा कृष्ण प्रकाश यांनी आज पदभार स्वीकारला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अप्रत्यक्षरित्या शहरातील राजकारणी आणि लॉबी असलेल्या व्यक्तींच्या दबावात येणारा आपण अधिकारी नसल्याचे स्पष्ट केले. पदभार स्वीकारल्यानंतरच्या आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी राजकीय नेत्यांना इशारा देत, शहरातील गुन्हेगारी संपुष्टात आणण्याचा उद्देश असल्याचे सांगितले.
“हस्तक्षेप आणि गटबाजीवर निपक्षपातीपणे काम करणारा मी अधिकारी आहे. माझ्यावर दबाव येत नाही, माझा इतिहास पाहा, जिथं मी काम केलं आहे ते रेकॉर्ड पाहा. मला दबावात काम करण्याची सवय नाही. जे खरं आहे तेच करतो.” असं परखड मत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी यावेळी माध्यमांसमोर व्यक्त केलं.
कृष्ण प्रकाश हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे तिसरे पोलीस आयुक्त आहेत. आत्तापर्यंत शहरात एकाही आयुक्ताक आपला कार्यकाळ संपेपर्यं कार्यरत राहू शकलेले नाही. कार्यकाळ होण्यापूर्वीच येथील पोलीस आयुक्तांची बदली झाल्याचा इतिहास आहे.
दरम्यान, सध्याची परिस्थिती पाहाता प्रथम प्राधान्य कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असल्याचे सांगत, एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने गैरहेतू ठेवून काम केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, अस इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे आता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी आणि कर्मचारी हे त्यांच्याशी कसं जुळवून घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.














