- तर, अजित गव्हाणे यांना काकांची मर्जी सांभाळणेच आले अंगलट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२०) :- महापालिकेत राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेते पदासाठी भोसरीचे नगरसेवक अजित गव्हाणे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, भोसरीत प्रतिस्पर्ध्याला ताकद मिळू नये म्हणून भाजपचे आमदार महेश लांडगे यांची मैत्री राजू मिसाळ यांच्या पथ्यावर पडली आहे. आणखी भर म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनीही शिफारस केल्याने पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादीतर्फे मिसाळ यांनी अर्ज दाखल केला.
भोसरीतील नगरसेवक व पदाधिका-यांनी बैठक घेऊन अजित पवार यांच्याकडे गव्हाणे यांची शिफारस केली होती. दरम्यान, भोसरीतील माजी आमदार विलास लांडे यांचा समर्थक गट पक्षाची ताकद वाढविण्यासाठी कमी पडत आहे. विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी लांडे यांनी पक्षाची उमेदवारी नाकारली. त्यावेळी अजित पवार यांनी गव्हाणे यांना उमेदवारीचा आग्रह केला. मात्र, काकांचा रोष नको म्हणून त्यांनी पवार यांचा शब्द पाळला नाही. असे नकारात्मक मुद्दे मिसाळ समर्थक गटाने उचलून धरले. त्यामुळे गव्हाणे यांचे नाव मागे पडल्याची राष्ट्रवादीच्या गोटात चर्चा आहे.
याउलट मिसाळ यांनी मावळ लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारात हिरीरिने सहभाग घेतला होता. त्यामुळे पार्थ यांनीही मिसाळ यांच्या नावाची शिफारस केल्याचे बोलले जात आहे. तसेच, विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघिरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे व इतर पदाधिकारी मिसाळ यांच्या पाठिशी उभे राहिले. तसेच भाजपचे आमदार महेश लांडगे व राजू मिसाळ यांची मैत्रीही विरोधी पक्षनेते पदासाठी कामी आल्याची चर्चा आहे.