न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही संक्रमण होत असून, आतापर्यंत दोनशेपेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, एकूण १२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे गेल्या १० दिवसांत ५ कर्मचारी दगावले आहेत. परिणामी कर्मचारी धास्तवाले आहेत.
संसर्गाचा फटका पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही बसला आहे. आतापर्यंत पालिकेच्या बहुतांश विभागातील २०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील बहुतांश कर्मचारी बरेही झाले आहेत. मात्र, १२ कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जनसंपर्क विभागाचे कर्मचारी संभाजी शिवराज पवार (वय ५१) यांचे सोमवारी (दि. ७) निधन झाले. तर, रविवारी (दि. ६) भोसरी रूग्णालयातील परिचारिका शोभा संजय भुजबळ (वय ५०) आणि बांधकाम परवानगी विभागातील कर्मचारी काळूराम दगडू नलावडे यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय विभागातील लिपिक भालचंद्र राऊत यांचा शुक्रवारी (दि. ४) मृत्यू झाला. विद्युत विभागातील मारूती सुदाम शेडगे यांचे २७ ऑगस्टला निधन झाले. केवळ दहा दिवसात ५ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे दुर्देवी मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू होत आहे, ही चिंताजनक बाब आहे. सर्वांनी खबरदारी घेऊन काम करावे. मृत कर्मचाऱ्यांना सुरक्षाकवच योजनेतून मोबदला मिळवून देण्याबाबत कार्यवाही केली जात आहे, असे पिंपरी – चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी सांगितले.