न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर. २०२०) :- पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र आणि पेठ क्रमांक १२ येथील गृहप्रकल्पाचे काम तातडीने मार्गी लावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
पुण्यात झालेल्या बैठकीत त्यांनी प्राधिकरणातील प्रकल्पांचा आढावा घेतला. प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त सौरभ राव, कार्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी उपस्थित होते.
प्राधिकरणातर्फे सेक्टर १२ येथे गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यात ४ हजार ८८३ सदनिका उभारल्या जात आहे. त्याची माहिती घेतली. गेल्या काही महिन्यांपासून या प्रकल्पाची गती मंदावली आहे. त्या अनुषंगाने सध्या काय काम सुरू आहे, कामाची प्रगती किती, त्याबाबतची माहिती त्यांनी जाणून घेतली. त्याचप्रमाणे मोशी येथील उभारण्यात येणा-या औद्योगिक प्रदर्शन केंद्रातंर्गत २० हेक्टर जागेत खुल्या प्रदर्शन केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत हे काम पूर्ण होण्याच्या तयारीत आहे. त्या प्रकल्पाबाबतही माहिती घेऊन योग्य त्या सूचना केल्या. प्राधिकरणाकडून आणखी काही प्रकल्प राबविता येतील का, याचेही नियोजन करण्याबाबत पवार यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.