न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर. २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना धन्वंतरी स्वास्थ्य योजना पूर्वीप्रमाणे लागू ठेवण्यास आयुक्तांनी तत्वतः मंजुरी दिली आहे. त्यामुळे खासगी कंपनीची विमा योजना रद्द केली जाईल, असे पिंपरी – चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी बुधवारी (दि. ९) सांगितले.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी धन्वंतरी स्वास्थ्य योजना १५ सप्टेंबरपासून बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि. ८) काळ्या फिती लावून हर्डीकर यांचा निषेध केला. त्यामुळे बुधवारी महापौर उषा ढोरे यांनी आयुक्तांसह सर्व पदाधिकारी, गटनेते व महासंघ पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.
यावेळी हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, अपक्ष आघाडीचे कैलास बारणे, नगरसेवक तुषार कामठे, महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, सुप्रिया सुपगुडे आदी उपस्थित होते.
महासंघाने धन्वंतरी योजना पूर्ववत योजना कायम ठेवण्याची आग्रही मागणी केली. चिंचवडे यांनी सांगितले की, हर्डीकर यांनी धन्वंतरी योजना अंशतः कायम ठेवण्याच्या निर्णयास तत्वत : मंजुरी दिली आहे.
धन्वंतरी योजना बंद करून विमा योजना सुरू करण्याची कार्यवाही १५ सप्टेंबरपासून केली होती. ती मुदत आणखी ५ दिवस वाढविली जाईल. धन्वंतरी योजना बंद करण्यास कर्मचारी महासंघाचा विरोध आहे. महासंघाशी चर्चा करून विमा योजनेतील त्रुटी दूर केल्या जातील. या संदर्भात चर्चेस सुरुवात झाली आहे. चर्चेतून मार्ग काढला जाईल. आज झालेल्या बैठकीत या संदर्भातील अधिकार माझ्याकडे देण्यात आले आहेत. लवकरच त्यावर अंतिम तोडगा काढला जाईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.