- आमदार अण्णा बनसोडे व पालिका आयुक्तांच्या सतर्कतेने मिळाला कोरोना रुग्णांना दिलासा…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर. २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने कोविड रुग्णांसाठी अधिग्रहित केलेल्या आकुर्डी येथील स्टार हॉस्पिटलमधील ऑक्सिजन सिलेंडरचा साठा बुधवारी मध्यरात्री संपुष्टात आला. सिलेंडरचा पुरवठा तात्काळ होणे आवश्यक असताना अनेक अडचणींना हॉस्पिटल प्रशासनाला सामोरे जावे लागले .मात्र यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर आणि आमदार अण्णा बनसोडे यांची तत्परता व सतर्कता कामी आली आणि हॉस्पिटल प्रशासनाबरोबर ६० ते ७० रुग्णांनाही दिलासा मिळाला.
याबाबत स्टार हॉस्पिटलचे संचालक डॉ अमित वाघ यांनी याबाबत माहिती दिली . ते म्हणाले आकुर्डी येथील स्टार हॉस्पिटल पिंपरी चिंचवड महापालिकेने कोविड रुग्णांसाठी अधिग्रहित केले आहे . सध्या हॉस्पिटल मध्ये ९५ रुग्ण उपचार घेत आहेत . सध्या दररोज कमीत कमी ११० ते १२० इतक्या ऑक्सिजन सिलेंडरची गरज असते .
बुधवारी मध्यरात्री हॉस्पिटलमधील ऑक्सिजन सिलेंडरचा साठा संपुष्टात आला. सिलेंडरचा पुरवठा तात्काळ होणे आवश्यक असताना अनेक अडचणींना हॉस्पिटल प्रशासनाला सामोरे जावे लागले . रात्री एकच्या सुमारास तातडीने सिलेंडर मिळणे अशक्य होते . त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सम्पर्क साधण्याचा प्रयत्न केला . मात्र त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने थेट त्यांचे आम्ही घर गाठले . कारण प्रश्न रुग्णांच्या जीव वाचाविण्याचा होता .
एकीकडे आयुक्तांशी संपर्क करत असताना दुसरीकडे आमदार अण्णा बनसोडे यांना देखील आमची अडचण सांगितली. त्यांनीही याबाबत प्रयत्न सुरु केले. आयुक्त हर्डीकर यांच्या घरी गेल्यानन्तर त्यांनी महापालीकेच्या यशवंतराव चव्हाण (वायसीएम ) हॉस्पिटलमधून तात्पुरत्या स्वरूपात सिलेंडरचा पुरवठा तात्काळ आम्हाला करता येईल का याची चाचपणी केली . तात्पुरत्या स्वरूपात सिलेंडरचा पुरवठा आम्हाला देता येईल याची खात्री झाल्यानंतर त्यांनी परवानगी दिली. आम्ही ही बाब आमदार बनसोडे यांच्या कानावर घातली .वायसीएम मधुन सिलेंडर आमच्या ताब्यात देईपर्यत पहाटे चारपर्यत आमदार बनसोडे आमच्या सोबत होते. अखेरीस वीस ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा आमच्या हॉस्पिटलला करण्यात आला आणि आमचा जीव भांड्यात पडला असे डॉ वाघ यांनी सांगितले.