- रुग्णांच्या जेवणाची होतेय आबाळ; नवीन विरोधी पक्षनेत्यांनी वेधले आयुक्तांचे लक्ष…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर. २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी आज (गुरुवारी) ऑटो क्लस्टर येथील कोविड सेंटरची पाहणी केली. पीपीई किट परिधान करून वार्डात जावून रुग्णांची विचारपूस केली. समस्या जाणून घेतल्या. तसेच निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याच्या तक्रारी रुग्णांनी केल्या आहेत, याकडे मिसाळ यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.
ऑटो क्लस्टर या ठिकाणच्या रुग्णांच्या अनेक तक्रारी माझ्याकडे येत होत्या. त्यामुळे या सेंटरला भेट दिली असता या कोविड सेंटरमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. रुग्णांना वेळेवर चहा, नाश्ता, जेवण मिळत नाही. मिळालेले जेवण निकृष्ट दर्जाचे आहे.
त्याचप्रमाणे या सेंटरच्या एका कोप-यात बायो मेडीकल वेस्टज (पीपीई किट, मास्क, ग्लोज इ.) चार दिवसापासून पडून असल्याचे तेथील रुग्णांशी बोलताना समजले. सदरची बाब अतिशय गंभीर आहे, अशा विषयांकडे मिसाळ यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले.