- ७१ पुरातन आणि दुर्मीळ नाणी तसेच देवीच्या अंगावरील दागिने गायब
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. सप्टेंबर. २०२०) :- कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या दुर्मीळ खजिन्यावर मंदिराच्याच धार्मिक व्यवस्थापकाने हात साफ केला आहे. विविध राजे आणि राजवाड्यांकडून दिलेली ७१ पुरातन आणि दुर्मीळ नाणी तसेच देवीच्या अंगावरील दागिने गायब झाले आहेत. मौल्यवान माणिक, चांदीचे दोन खडाव आणि संस्थानाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीच गायब केल्याचा अहवाल चौकशी समितीने जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडीवर अफरातफर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.
मंदिराच्या खजिन्याच्या एकूण अकरा चाव्या होत्या मात्र यापैकी तीन चाव्या हरवल्या आहेत. देवीच्या अंगावरील दागिने ठेवण्यासाठी पाच पेट्या आहेत. यातील चौथ्या पेटीत अकरा दागिन्यांची नोंद होती, ज्यात चांदीच्या पादुका गायब असल्याचं आढळलं. पाचव्या पेटीतील अलंकारही पळवून नेले असल्याचे आढळून आले. मौल्यवान दागिन्यांच्या या चोरी प्रकरणात दोषी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची शिफारस चौकशी अहवालात करण्यात आली होती.
बिकानेर संस्थान ४, औरंगजेब १, डॉलर ६, उदयपूर संस्थान ३, शहाआलम इझरा ४, बिबा शुरुक १, फुलदार १, दारुल खलिफा १, फत्ते औरंगाबाद औरंगजेब आलमगीर १, इंदूर स्टेट सूर्यछाप १, अकोट २, फरुखाबाद १, लखनऊ १, पोर्तगीज ९, इस्माईल शहा १, बडोदा २, रसुलइल्ला अकबर व शहाजहान ४, जुलस हैदराबाद ५, अनद नाणे २० तुळजाभवानी मंदिरातील ही दुर्मीळ नाणी आहेत गायब


















