न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. सप्टेंबर. २०२०) :- देशातील व्यापार आणि व्यवसायिक वातावरणाच्या स्वातंत्र्यासंदर्भातील परिस्थितीमध्ये भारताची जागतिक स्तरावर घसरण झाली आहे. आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात भारत २६ स्थानांनी घसरला आहे. वेगवेगळ्या देशांमधील व्यवसायिक वातावरण किती पोषण आणि देशातील आर्थिक परिस्थिती संबंधित मूल्यमापन करणाऱ्या कॅनडामधील फ्रेजर इन्स्टिटयूटने प्रकाशित केलेल्या ‘ग्लोबल इकनॉमिक फ्रिडम इंडेक्स’मध्ये भारत २६ क्रमांकांनी घसरुन १०५ व्या क्रमांकावर गेला आहे.
या अहवालामध्ये १६२ देशांचा समावेश आहे. मागील वर्षी भारत ७९ क्रमांकावर होता. या यादीमध्ये हाँगकाँग आणि सिंगापूरसारखे लहान देश अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. अनेक छोटे देश हे या यादीमध्ये भारतापेक्षा बरेच पुढे असल्याचे दिसत आहे.
या अहवालामध्ये भारतामधील व्यापारासंदर्भातील आर्थिक स्वातंत्र्य अधिक मिळण्याबद्दलचा मार्ग भविष्यातील आर्थिक सुधारणा आणि आर्थिक व्यापारासाठी भारतीय बाजारपेठेसंदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयांवर अवलंबून असेल असं म्हटलं आहे. या यादीमध्ये अव्वल दहा देशांमध्ये न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मॉरिशस, जॉर्जिया, कॅनडा आणि आयर्लंडचा समावेश आहे. या १६२ देशांच्या यादीमध्ये आफ्रिकेतील अनेक देश हे तळाशी आहेत. यामध्ये प्रामुख्याने कांगो, झिम्बाब्वे, सूदानसारख्या देशांबरोबरच अल्जेरिया, इराण, व्हेनेझुएलासारख्या देशांचा समावेश आहे.