न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज सोमवारपासून कोणत्याही प्रकारचा लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला नसून, नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी – चिंचवडच्या आयुक्तांसह जिल्हाधिकारी व इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात रूग्णवाढीबाबत चर्चा झाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार, अशी अफवा शहरात दोन दिवसांपासून सुरू आहे.
पिंपरी चिंचवड शहरात लॉकडाऊनसंदर्भात पुण्यातील बैठकीत कोणतीही चर्चा झालेली नाही. पालकमंत्र्यांनीही लॉकडाऊनसंदर्भात सूचना केलेली नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, फिजिकल डिस्टन्सिगचे पालन करावे आणि मास्कचा वापर करावा, असे आवाहन आयुक्तांनी केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लाॅकडाऊनबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. तथापि सोशल मिडीयामध्ये प्रसारीत होत असलेल्या याबाबतच्या वृत्तामध्ये तथ्य नसल्याने यांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहनही हर्डीकर यांनी केले आहे.


















