- कामाची मुदत संपूनही पालिका ढिम्म, ठेकेदारावर मेहेरबान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ सप्टेंबर २०२०) :- बिजलीनगर गुरुद्वारा चौकातील अंडरपासच्या कामाची मुदत संपली आहे. मुदतीत काम पूर्ण झाले नाही. अर्धवट असलेले हे काम संथगतीने सुरु आहे. याचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे. पुलाचे काम त्वरित पूर्ण करावे, अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयुर जयस्वाल यांनी दिला आहे.
याबाबत पालिकेच्या ‘ब’ प्रभागाचे अधिकारी प्रशांत जोशी यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी सेवादल अध्यक्ष मकरध्वज यादव, युवक काँग्रेसचे विशाल कसबे, स्वप्नील शिंदे उपस्थित होते.
सन २०१८ पासून प्रभाग क्रमांक २० येथील बिजलीनगर ते गुरुद्वारा चौक अंडरपासचे काम सुरू असून अद्याप ते अर्धवट स्थितीमध्ये आहे. स्थायी समितीच्या आदेशानुसार काम संपुर्ण करण्याची काल मर्यादा मार्च २०२० होती. परंतु हे काम अद्याप ५० टक्के देखील पूर्ण झालेले नाही. गेली दोन वर्षे निगडी-प्राधिकरण- रावेतला जोडणारा मुख्य रस्ता या कामानिमित्त वाहतूकीसाठी बंद आहे.
नागरिकांना पर्यायी म्हणून गल्लीबोळातून वाहतूक करावी लागत आहे. त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात होतात व वाद विवाद निर्माण होतात. हा मुख्य रस्ता बंद असल्याने पीएमपीएल बससेवा बंद असून, कामगारांच्या कंपनी बससेवा, मुलांची शाळेची बससेवा या मार्गावर बंद आहेत. तसेच या रस्त्यालगत असणारे छोटे-मोठे दुकानदार व व्यापारी यांचे व्यवसाय पूर्णपणे बंद पडले आहेत. करदात्यांचे करोडो रुपये खर्च करून या अंडरपास ( सबवे) ची गरज काय, हा सवाल नागरिक विचारीत आहेत. संथगतीने चालणाऱ्या या कामाच्या विरोधात नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. अंडरपासचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे; अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा, इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.


















