न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ सप्टेंबर २०२०) :- राज्य शासनाच्या ‘ माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ या मोहिमेसाठी नगरसेवक व महिला बचत गटांमार्फत नेमण्यात येणाऱ्या स्वयंसेवकांना प्रत्येक घरटी १५ रुपये मानधन दिले जाणार आहे, असे स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे यांनी बुधवारी (दि. १६) सांगितले.
ही योजना १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर आणि १४ ते २४ ऑक्टोबर अशा दोन टप्प्यात शहरात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत एकूण २४ लाख ७६ हजार ४८३ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी २ हजार १६६ स्वयंसेवक नेमले जाणार आहेत.
दोन स्वयंसेवकांना प्रत्येकी घरटी ३० रुपये मानधन दिले जाणार आहे. घरोघरी जाऊन कुटुंबातील सर्व सदस्यांची आजारविषयक माहिती घेतली जाणार आहे. तसेच, कोणाला कोरोनाची लागण झाली किंवा नाही यांची नोंद घेतली जाणार आहे. तसेच, ऑक्सिजन व तापमान तपासले जाणार आहे.