- नवीन पोलीस आयुक्तांनी हारतुरे स्वीकारण्यापेक्षा वाहनचोरांचा बंदोबस्त करावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२०) :- पोलिसांना आव्हान दिल्याप्रमाणे वाहनचोरांनी शहरामध्ये वेगाने चोरीसत्र सुरू केल्याचे चित्र आहे. बुलेट, महागड्या दुचाकी, मोपेड चोरीला जाण्याच्या घटना जवळपास दररोज घडत आहेत. शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आणखी सहा दुचाकींची चोरी झाल्याच्या घटनांची नोंद झाली आहे.
नाशिकमधील सराईत दुचाकी चोर बुलेटराजाने शहरातून महागड्या दुचाकींची चोरी केल्याचे समोर आले आहे. गेल्या महिन्याभरामध्ये सातत्याने दुचाकी चोरीच्या घटनांची नोंद होत आहे. घराजवळ लावलेल्या, कामाच्या ठिकाणावरील अथवा कामानिमित्त बाहेर गेलेल्या ठिकाणी लावलेली दुचाकी चोरुन नेल्या जात आहेत.
भोसरीतील दिघी येथून १६ सप्टेंबरच्या रात्री दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार सुयोग सूर्यकांत चव्हाण (वय २४, रा. चव्हाण वस्ती, चऱ्होली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात दिली आहे. राहत्या घराजवळ लावलेले वाहन १३ सप्टेंबरच्या मध्यरात्री चोरुन नेल्याची तक्रार मनोज कुमारपाल करोतीया (वय ३८, रा. अशोकनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. प्रवीणकुमार अभंगराव हुपळे (वय ३३, रा. संतनगर केंद्रीय विहार, मोशी) यांची दुचाकी राहत्या घराजवळून १४ सप्टेंबरच्या मध्यरात्री पळवून नेली. याप्रकरणी भोसरी एमआयडीसीमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. संकेत सूर्यकांत लंभाते (वय २८, रा. बेव्हरी हिल्स, तळेगाव दाभाडे) यांची दुचाकी राहत्या घराजवळून १५ सप्टेंबरच्या रात्री पळवून नेल्या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. विजय राघवेलू मदिला (वय ४२, रा. राऊत नगर, मामुर्डी) यांची दुचाकी घरासमोरील रस्त्यावरुन ३ सप्टेंबरच्या रात्री चोरीस गेली. तर, दिनेश दिवाकर देशपांडे (वय ३७, रा. सनफ्लॉवर गार्डन, वाकड) यांची दुचाकीदेखील घरासमोरून चोरीस गेली आहे. या प्रकरणी अनुक्रमे देहूरोड आणि वाकड पोलीस ठाण्यात गन्हा दाखल झाला.














