- खुलासा द्या; नगरसेवक तुषार कामठेंची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ सप्टेंबर २०२०) :- महापालिकेच्या वैद्यकीय विभागासाठी साहित्य पुरविणाऱ्या ठेकेदाराने पिंपरी चिंचवड महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, कनिष्ठ अभियंता सुनील बेळगावकर, बायोमेडिकल इंजिनिअर सुनील लोंढे या तीन अधिकाऱ्यांच्या बँक खात्यावर लाखो रुपयांची रक्कम दिली होती. विशेष म्हणजे ही रक्कम संबंधित ठेकेदाराने आपल्या आयकर विवरणपत्रातही दाखविली होती. आयुक्तांनी या प्रकरणी पालिकेच्या या तीन अधिकाऱ्यांवर कारवाई केली व खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले होते. तसेच त्यांचे पूर्ण आर्थिक अधिकार काढून घेतले होते.
याबाबत मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी महापालिका आयुक्तांना महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी बँक खात्यावर लाच स्वीकारल्या प्रकरणी तसेच निविदांमधिल आढळलेल्या अनियमिततेबाबत / भ्रष्टाचाराबाबत तपास पूर्ण करून अहवाल सादर करण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत दिली होती. ही मुदत बुधवारी (दि. २३) सप्टेंबर रोजी पूर्ण झाली आहे. नगरसेवक तुषार कामठे यांनी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दोषींवर काय कारवाई केली याबाबत विचारणा केली आहे.
मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी आयुक्तांना दिलेल्या सहा आठवड्याच्या कालावधीमध्ये दोषी अधिकाऱ्यांची कोणामार्फत आणि काय काय चौकशी केली, त्यांच्यावर काय करवाई केली, तसेच या प्रकरणात दोषी आढळलेल्या ठेकेदारांवर काय कारवाई केली याचे लेखी उत्तर/ खुलासा करण्यात यावा. तसेच निविदांमध्ये आढळलेल्या अनियमिततेबाबत /भ्रष्टाचाराबाबत आपण काय काय चौकशी केली तसेच सदर प्रकरणांमध्ये कोणकोण दोषी आढळले व दोषींवर काय कारवाई केली याचा खुलासा करण्यात यावा.
तसेच दिनांक ६ जून २०२० रोजी महानगरपालिकेच्या महासभेत सादर केलेल्या पत्रानुसार आयुक्तांनी संबंधितांवर काय काय कारवाई केली तसेच भविष्यात कारवाई करणार आहात याचे लेखी स्पष्टीकरण लवकरात लवकर द्यावे, असे या निवेदनात नगरसेवक कामठे यांनी म्हटले आहे.


















