- २०० मिलीची प्लाझ्मा बॅग मिळणार साडेपाच हजारात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ सप्टेंबर २०२०) :- करोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (२०० मि.ली.) खाजगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून साडेपाच हजार इतका कमाल दर आकारण्यास मान्यता दिली आहे.
यापेक्षा अधिक दर आकारल्यास त्यांनी आकारलेल्या अतिरिक्त रक्कमेची परतफेड संबधित रुग्णांना करणे अनिवार्य राहील अन्यथा संबंधित रक्तपेढीचा परवाना रद्द करण्याबाबतची कारवाई संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
रुग्णांना किफायतशीर दरात हा प्लाझ्मा उपलब्ध करुन देण्यासाठी या प्लाझ्माच्या प्रती डोसची किंमत निश्चित करण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत तज्ज्ञ समिती नेमण्यात करण्यात आली होती. या समितीने प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने प्लाझ्मा संकलित करण्यासाठी लागणारे खर्च व राष्ट्रीय रक्त धोरणानुसार निश्चित केलेलल्या रक्तावरील अतिरिक्त चाचण्यांवर आकारण्यात येणारे सेवा शुल्क लक्षात घेऊन दर निश्चिती केलेली आहे. त्यानुसार प्लाझ्मा बॅगसाठी (२०० मिली) ५,५०० रुपये आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे.
नॅट चाचणीसह प्लाझ्मा बॅग उपलब्ध करुन दिल्यास या चाचणीसाठी कमाल दर १,२०० रुपये प्रति चाचणी (प्लाझ्मा बॅगेच्या किंमतीव्यतिरक्त) तर केमिल्युमिनेसन्स तपासणी करुन प्लाझ्मा बॅग दिल्यास त्यासाठी प्रतिचाचणी कमाल दर ५०० रुपये (प्लाझ्मा बॅग किंमती व्यतिरक्त) आकारण्यास मान्यता दिली आहे.