न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ डिसें.) :- भोसरी ते वाय. सी. एम. रुग्णालया दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी शिवसेनेच्या पिंपरी विधानसभेचे संघटक जितेंद्र ननावरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यात भोसरी ते वाय. सी. एम. रुग्णालया दरम्यानचा रस्ता वाहतुकीस अपुरा पडत आहे. महापालिकेने रस्ता रुंदीकरण न केल्यामुळे या मार्गावर दिवसेंदिवस अपघात घडत आहेत. महापालिकेच्या सततच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बळी जात असून, अजून किती जणांचे बळी प्रशासन घेणार आहे? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे. एमआयडीसी ते वायसीएम रुग्णालयापर्यंतच्या रस्त्यावरून अक्षरश: नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे.
मागील ऑक्टोंबर महिन्यात या भागात चार गंभीर स्वरूपाचे अपघात घडले असून, या अपघातामध्ये दोन जणांचा नाहक बळी गेला आहे व दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या २४ मीटर रस्त्याच्याकडेला अतिक्रमणाने विळखा घातला आहे. हा मुख्य रस्ता भोसरी, वायसीएम रस्ता व एमआयडीसी ला जोडला जात असून, खेड, जुन्नर, राजगुरूनगर, शिक्रापूर व इतर भागातील बहुसंख्य नागरिक उपचारासाठी या ठिकाणी येत आहेत तसेच एलबीटी बंद झाल्यामुळे औद्योगिक कंपन्या मोठ्या प्रमाणावर एमआयडीसी परिसरात येत आहेत. त्यामुळे वाहनांची संख्या भरपूर वाढलेली आहे. २४ मीटर रस्ता अपुरा पडत आहे. फूटपाथवर वाशिंग सेंटर, हॉटेल्स, टपऱ्या यांनी अतिक्रमण केले आहे.
माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे या भागाचे प्रतिनिधित्व करीत असताना तत्कालीन प्रशासनाकडे याबाबत पाठपुरावा सुरु केला होता तसेच अंदाजपत्रकात या कामाची तरतूदही केली होती. परंतु, सुस्त प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या परिसराचे रस्ता रुंदीकरण झाले नाही. महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर या रस्त्याचे रेखांकन करून केलेल्या अतिक्रमणावर कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार असल्याचे, जितेंद्र ननावरे यांनी या निवेदनात नमूद केले आहे.










