न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २३ जुलै २०२६) :- मुळशी तालुक्यातील नेरे परिसरात बांधकामावर काम करणाऱ्या एका मजुराचा निर्घृण खून करून मृतदेह विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन पात्रा (मूळ रा. सिमुलताला, जिल्हा नाडिया, पश्चिम बंगाल) हा नेरे येथील सर्व्हे क्रमांक ६३ मधील बांधकाम साईटवर काम करत होता. बुधवारी (२२ जुलै) सकाळी ११ वाजण्यापूर्वी सर्व्हे क्रमांक ६१, मेमाणे वस्ती येथील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. मृताच्या डाव्या कानाच्या वरच्या भागावर आणि कपाळावर गंभीर मारहाणीच्या जखमा होत्या. तसेच त्याचे हात, पाय आणि कंबर वायरने बांधून मृतदेह विहिरीत टाकण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या घटनेप्रकरणी रामदास पांडुरंग मेमाणे (वय ६३, रा. नेरे, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात संतू ऊर्फ विशाल बासुदेव मांजी (वय २२, मूळ रा. नाडिया, पश्चिम बंगाल) याला अटक करण्यात आली असून, खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस आरोपीची कसून चौकशी करत असून वैयक्तिक वाद, आर्थिक व्यवहार किंवा इतर कारणांमधून हा खून झाला का, याचा तपास सुरू आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार करीत आहेत.
















