- नगरसेविका अनिता संदीप काटे यांची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २३ जुलै २०२६) :- पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने लागू केलेली १५ टक्के पाणी कपात आता तातडीने रद्द करून नागरिकांना नियमित, पुरेसा आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक २८ च्या नगरसेविका सौ. अनिता संदीप काटे यांनी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.
महापालिकेने पाणी कपात लागू केल्यानंतर शहरातील विविध भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असून, अनेक नागरिकांनी अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. विशेषतः पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक २८ मधील नागरिकांना पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे नगरसेविका काटे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
सध्या पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे पवना धरणातील पाणीसाठा सुमारे ९० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे १५ टक्के पाणी कपात कायम ठेवण्याचे कारण उरलेले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर पिंपळे सौदागर परिसरातील पाणी कपात तात्काळ रद्द करून नागरिकांना नियमित, पुरेसा आणि शुद्ध पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होणारा मनस्ताप लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, आणि परिसरातील पाणीपुरवठा पूर्ववत करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही नगरसेविका अनिता काटे यांनी व्यक्त केली आहे.
















