न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ डिसें.) :- पोलीस मित्र अमोल कानु व अमित डांगे यांच्या सतर्कतेमुळे मोठी बस दुर्घटना होण्यापासून वाचली. याबाबत प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, गुरुवार (दि. २९ नोव्हें) रोजी दुपारी २.१५ वाजता इंद्रधनुष्य लिंकची पीएमपीएल निगडी बस स्थानकातून आकुर्डी रेल्वे स्थानकाकडे निघाली असता, भक्ती-शक्ती चौकातून प्राधिकरण संत ज्ञानेश्वर चौक येथे आली. तेंव्हा बसच्या मागील बाजूने मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला होता.
त्याच सुमारास प्राधिकरण येथून जाणारे प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे पोलीस मित्र अमोल कानु व अमित डांगे यांच्या ते लक्षात आले. त्यांनी तात्काळ बस चालकास ते निदर्शनास आणून दिले. त्यामुळे चालकाने बस रस्त्याच्या कडेला घेतली, थोड्याच वेळात बसच्या चारही बाजूने धूर निघण्यास सुरुवात झाली. बस मधील प्रवाशी सजग होऊन उतरले आणि बसपासून सुरक्षित अंतरावर थांबले. समितीच्या दक्ष कार्यकर्त्यांनी त्वरित चालकाला सावध केल्यामुळे मोठी दुर्घटना टाळण्यात यश आले. सदरची बाब चालकाने निगडी बस डेपो येथे कळवली व बसची रवानगी दुरुस्तीसाठी वर्कशॉप मध्ये करण्यात आली.
याबाबत प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,”पालिका प्रशासन व पीएमपीएल प्रशासनाने सार्वजनिक बस व्यवस्थेबद्दल सजग राहणे आवश्यक आहे. प्रशासन नवीन बस खरेदीमध्ये ज्याप्रमाणे तत्परता दाखवते तेवढीच सजगता मात्र देखभाल व दुरुस्ती बाबत दाखवत नाही. त्यामुळे अशी जीवघेणी परिस्थिती निर्माण होते. सध्या २५ नवीन पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस पीएमपीएलच्या ताफ्यात सामील होणार आहेत. त्याबाबत महापौर आणि आयुक्त स्वतः जातीने लक्ष घालत आहेत. मात्र, त्याबरोबरच सीएनजी बसच्या दुरुस्तीकडेही लक्ष देणे महत्वाचे आहे.”















