न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२०) :- करोनाचे देशभरात वाढते रुग्ण आणि त्यांच्यासाठी नेमक्या किती प्रमाणात ऑक्सिजनचा वापर करायचा याचे सुस्पष्ट धोरण व मार्गदर्शक तत्वे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आता जारी केली आहेत.
ऑक्सिजनचा वापर करताना योग्य वापर व्हावा व तसेच गळती आणि फुकट जाऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी याची मार्गदर्शक तत्वे आरोग्य विभागाने जाहीर केली. त्यानुसार २५ सप्टेंबर रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अपर सचिव आरती आहुजा यांनी देशातील सर्व राज्यांना करोना रुग्णांसाठी नेमक्या किती प्रमाणात ऑक्सिजनचा वापर करावा याचा चार्टच पाठवला आहे.
यात स्पष्टपणे म्हटले आहे की, देशातील एकूण करोना रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेली आहेत. यांना घरी किंवा क्वारंटाईन केंद्रात विलगीकरणाखाली ठेवावे. १७ टक्के रुग्ण ‘मॉडरेट’ वर्गातील असून त्यापैकी ज्यांची ऑक्सिजनची पातळी ९० ते ९४ एवढी आहे अशा रुग्णांना नोझलद्वारे म्हणजे नाकात नळीद्वारे २ ते ४ लिटर ऑक्सिजन प्रति मिनिट तर फेसमास्कद्वारे ऑक्सिजन दिल्यास प्रति मिनिट ६ ते १० लिटर आणि नॉन रिब्रिदिंग मास्कद्वारे दिल्यास प्रति मिनिट १० ते १५ लिटर ऑक्सिजन द्यावा असे स्पष्टपणे नमूद केले आहे.
अतिदक्षता विभागातील कोमॉर्बिड व ‘सिव्हिअर’ अशा ३ टक्के रुग्णांची, ज्यांची ऑक्सिजनची पातळी ९० च्या खाली आहे अशा रुग्णांसाठी इन्व्हेसिव्ह मेकॅनिकल व्हेंटिलेशनद्वारे १० लिटर प्रति मिनिट, नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशनद्वारे २५ ते ६०लिटर प्रति मिनिट तर नॉन रिब्रिदिंग मास्कद्वारे १० ते १५ लिटर प्रति मिनिट वेगाने ऑक्सिजन देण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केली असून सर्व राज्यांना त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे.
रुग्णाची ऑक्सिजनची पातळी ९४- ९५ एवढी झाल्यानंतर त्याला अतिरिक्त ऑक्सिजन देऊ नये. तसेच ऑक्सिजन हे जीवनावश्यक औषध असल्याने त्याचे काटेकोरपणे नियमन रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिकांनी करावे, अशा स्पष्ट सूचनाही देण्यात आल्या आहेत.















