न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२०) :- सोशल मीडियावरून एस्कॉर्ट सर्व्हिसेसच्या नावाखाली हिंजवडी येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. या हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने पर्दाफाश केला आहे.
चार तरुणींची सुटका करून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन पोलिसांनी एकाला अटक केली आहे. गणेश कैलास पवार (वय २०, सध्या रा. येळवंडे वस्ती, हिंजवडी, मूळगाव सताळ पिंपरी, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह समीर ऊर्फ राज ऊर्फ तय्यब सय्यद, युसुफ सरदार शेख तसचे हिरा (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्याविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या आदेशान्वये अवैध धंद्यांच्या समूळ उच्चाटनासाठी झीरो टॉलरन्स मोहीमअंतर्गत कारवाईचे सत्र सुरू आहे. हिंजवडी फेज एकमधील लक्ष्मी जी, चौकालगतच्या येळवडे वस्ती येथील हॉटेल ग्रॅन्ड मन्नत येथे काही तरुणींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतला जात आहे, अशी माहिती मिळाली. एका बनावट ग्राहकास पाठवून खात्री केल्यावर पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला. तेथे चार तरुणींना डांबून ठेवले असल्याचे निदर्शनास आले. अटक केलेला आरोपी गणेश पवार हा या हॉटेलचा मॅनेजर असून तो व इतर आरोपी लॉजमध्ये या तरुणींकडून जबरदस्तीने देहविक्रीचा व्यवसाय करून घेत होते. पोलिसांनी या तरुणींची सुटका केली. त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना रेस्क्यू फाउंडेशन, संरक्षण गृह, मोहम्मदवाडी, पुणे येथे रवाना करण्यात आले.















