- लोकांची दाटीवाटीने गर्दी, रेशन कार्डधारक तिष्ठत उभे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑक्टोबर २०२०) :- कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव पसरू नये या उद्देशाने सोशल डिस्टंट ठेवण्यासाठी सर्वच स्तरातून अवाहन होत असतानाच निगडीतील संत तुकाराम व्यापार संकुल येथे असलेल्या परिमंडळ कार्यालयात कामानिमित्त आलेले नागरिक, रेशन पुरवठादार व चमकोगिरी करणा-यांची भाऊगर्दी होत असून, यावेळी कोरोना संसर्गाची टाळण्यासाठी आवश्यक असणारे सामाजिक अंतर नियम धाब्यावर बसविले जात आहेत.
निगडीतील संत तुकाराम व्यापार संकुल येथे असलेल्या परिमंडळ कार्यालय ‘ अ ‘ अंतर्गत देहूरोड , निगडी , चिंचवड , सांगवी , पिंपळे गुरव , रहाटणी , काळेवाडी , थेरगाव आदी भाग येतो , तर ‘ ज ‘ अंतर्गत पिंपरीगाव , पिंपरी कॅम्प , मोहननगर , खराळवाडी आदी भाग येतो. या परिसरातील शिधापत्रिकेशी संबंधित कामकाज या कार्यालयात चालते.
सध्या कोरोनामुळे शासनाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन केलेले असताना वाढत्या गर्दीकडे कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी याकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येते. अधिकारी कोण, कर्मचारी कोण आणि ऐजंट कोण याबाबत माहिती नसल्याने एखाद्या कामासाठी कार्यालयात येणा-या नागरिकांचा यामुळे गोंधळ उडताना दिसत आहे. खुद्द शासनाच्या कार्यालयात सामाजिक अंतर ठेवण्याच्या आदेशाचे खुल्लमखुल्ला उल्लंघन होत असल्याचे चित्र पहावयास मिळत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. सोशल डिस्टन्स ठेवण्याच्या आदेशाची या कार्यालयाला मुभा आहे का अशी शंका घेतली जात आहे.


















