- मृत्यूसंख्येत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२०) :- भारतात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या शुक्रवारी एक लाखांवर पोहोचली. जगभरात आतापर्यंत करोनामुळे १० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. याचा अर्थ जगभरातील एकूण मृत्यूंपैकी १० टक्के मृत्यू भारतात झाले आहेत.
भारताच्या तुलनेत फक्त अमेरिका आणि ब्राझिलमध्ये सर्वात जास्त मृत्यूंची नोंद झाली आहे. अमेरिकेत २ लाख १२ हजार तर ब्राझिलमध्ये १ लाख ४५ हजार जणांचा करोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे. भारतात करोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण १.५६ टक्के इतकं झालं आहे.
दरम्यान भारतातील एकूण मृत्यूसंख्येत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ३८ हजार रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील मृत्यूदरदेखील जास्त असून २.६७ टक्के इतका आहे. सर्वाधिक मृत्यूदर पंजाबमध्ये आहे. पंजाबमध्ये रुग्णसंख्या १ लाख १५ हजार असून ३५०० जणांचा मृत्यू झाला आहे. येथील मृत्यू दर सध्या तीन टक्क्यांवर आहे.















