- थेरगावात एकीवर गळ्यावर वार तर,
- वाकडमध्ये दुसरीचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न…
सुरज करांडे – क्राईम प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १३ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरात पतींकडून पत्नींवर जीवघेणे हल्ले केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. थेरगावमध्ये मुल होत नसल्याच्या कारणावरून पतीने पत्नीच्या गळ्यावर भाजी कापण्याच्या चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना घडली. तर वाकडमध्ये चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा गळा दाबून तसेच चाकूने कंबरेवर आणि बगलेवर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पत्नीला वाचवण्यासाठी आलेल्या मुलीलाही चाकू लागून ती जखमी झाली.
थेरगावातील घटनेत नितेश नंदकिशोर गायकवाड (वय ३५, रा. कैलासनगर गल्ली क्रमांक १, थेरगाव) याच्याविरुद्ध काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास आरोपीने त्याच्या २५ वर्षीय पत्नीशी मुल होत नसल्याच्या कारणावरून वाद घातला. त्यानंतर तिला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने भाजी कापण्याच्या चाकूने तिच्या गळ्यावर वार केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमोल लहु कांबळे यांनी फिर्याद दिली असून, काळेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वाकडमधील दुसऱ्या घटनेत कृष्णाजी विश्वनाथ सोमवंशी (वय ३५, रा. दत्तमंदिर रोड, वाकड) याच्याविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ११ ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी महिला घरातील किचनमध्ये दूध गरम करत असताना आणि कंबरदुखीच्या औषधांच्या गोळ्या घेत असताना आरोपी पतीने तिच्याशी वाद घातला. पत्नीने नकार दिल्याच्या रागातून तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेत आरोपीने तिचा गळा दोन्ही हातांनी दाबून श्वास कोंडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चाकूने तिच्या कंबरेवर आणि उजव्या बगलेवर वार करून तिला गंभीर जखमी केले.
दरम्यान, आईला वाचवण्यासाठी मुलगी भांडणे सोडवण्यासाठी आली असता तिच्या उजव्या गुडघ्याला आणि हाताला चाकू लागून तीही जखमी झाली. या प्रकरणी वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही घटनांचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.


















