- कृती समिती पर्यावरण विभागाच्या अभ्यासकांचे निरीक्षण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहराच्या वाढत्या आलेखामुळे पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास आता कमी होत चालला आहे. त्यातच बदकासारख्या उभयचर पक्ष्यांचा अधिवास आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ‘पक पक’ करून पाण्यावर तरंगणारे व पडदे असणाऱ्या तीन बोटांवर डुलत चालणारे इंडियन रनर जातीची पांढरी बदके व सिल्व्हेट मेटा जातीची तपकिरी – करड्या रंगाची व पिवळ्या चोचीच्या बदकांचे दर्शन आता वाढत्या शहरीकरणामुळे कमी होत चालले आहे.
पाणथळ आणि दलदलीच्या जागेवर त्यांचा अधिवास असतो अश्या जागा आता शहरात बोटावर मोजता येईल इतक्याच राहिल्या आहेत. त्यातच वाढत्या जमिनीच्या अतिक्रमनामुळे शहराच्या “ग्रीन बेल्ट” मध्ये सुद्धा आता मोठी कपात होत चालली आहे. मार्च -एप्रिल हा काळ ह्या पक्ष्यांचा प्रजननाचा काळ असतो. सदरच्या काळात ह्या पक्ष्यांना त्यांचे नैसर्गिक खाद्य म्हणजे जमिनीवरील लहानसहान किडे, धान्य ,फळे, रसाळ मुळे मिळणे आवश्यक असते. नेमक्या ह्याच प्रजननाच्या कालखंडात कोरोना म्हणजेच कोविड १९ चा शहरात शिरकाव झाला.
ह्या काळात सांसर्गिक रोगापासून बदकासारख्या जलीय पक्ष्यांचे संरक्षण होण्यासाठी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण विभागाचे अभ्यासक सदस्य अर्चना घाळी, विजय मुनोत, तेजस सापरीया, अँड विद्या शिंदे, संतोष चव्हाण, सतीश देशमुख, बाबासाहेब घाळी, विशाल शेवाळे, अमित डांगे हे राज्य समिती अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक अभ्यास गट मार्च २०२० पासून कार्यरत आहे. त्यामुळे अश्या बदकांना कठीण समयी धान्य व फळे खाण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली. तसेच पांढरी हगवण व गोचडीजन्य तापापासून सुरक्षित राहण्यासाठी परिसरात स्वच्छता ही करण्यात आली.
या प्रसंगी अभ्यासक गटाच्या प्रमुख सदस्य अर्चना घाळी म्हणाल्या,” १९६६ च्या पशुधन गणनेनुसार भारतातील बदकांची संख्या ९९ लाखाच्या आसपास होती. पश्चिम बंगालमध्ये ती सर्वात जास्त ५३ लाख होती तर महाराष्ट्र राज्यात अवघी ४३ हजार. आसाम, तामिळनाडू, केरळ, बिहार व ओरिसा राज्यात बदकांची संख्या मोठया प्रमाणात आहे. महाराष्ट्र राज्यात मात्र ती तुलनेने खूपच कमी आहे. आपल्या पिंपरी चिंचवड शहरात अश्या पद्धतीने बदकांचे संवर्धन करताना नक्कीच आनंद होतो.”
समिती सदस्य विजय मुनोत म्हणाले, “महाराष्ट्र राज्यात बदकांच्या संख्येची प्रामाणिक गणना आवश्यक आहे. बदके ही कोबड्यांप्रमाणे पालन करताही येतात.त्यांचा व्यावसायिक ही वापर होऊ शकतो.दुगार्देवी उद्यान परिसराच्या मागील बाजूस सध्या बदकांचे विलोभनीय दर्शन होते.त्याच परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून आमचा अभ्यास गट संवर्धनासाठी कार्यरत आहे.”
समिती अध्यक्ष व बदकांच्या अभ्यास गटाचे प्रमुख विजय पाटील म्हणाले,”जलीय अन्नसाखळी नियंत्रित करण्यासाठी बदकांची भूमिका मोठी असते. आपल्या शहरात पाणथळ आणि दलदलीच्या जागा ह्या प्रशासनाने ह्या पक्ष्यांसाठी ग्रीन बेल्ट अंतर्गत आरक्षित ठेवणे आवश्यक आहे. जलीय वनस्पती ह्या पाण्यातील प्राणवायू वाढवतात. बदकांच्या विष्ठेचा फायदा जलीय वनस्पतीला होतो. नर बदकापेक्षा मादी बदक हे जास्त आवाज करते. ते सर्वभक्षक अन्नप्रणालीमध्ये मोडते. दलदलीच्या ठिकाणीच ते स्वतःचा अधिवास निर्माण करत असतात. त्यामुळे शहरात अश्या अधिवासांचे संरक्षण होणे आवश्यक आहे”


















