- व्यावसायिकाकडून ७ लाखांची खंडणी उकळल्याचा आरोप..
- मामुर्डीत तिघांवर गुन्हा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूरोड (दि. १३ ऑगस्ट २०२६) :- बांधकाम प्रकल्पाचे काम वारंवार बंद पाडून ते सुरू करण्याच्या मोबदल्यात धमकी देत व्यावसायिकाकडून सात लाख रुपये उकळल्याची घटना मामुर्डी येथे समोर आली आहे. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी तिघांविरुद्ध खंडणी, धमकीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मामुर्डीतील साईनगर परिसरात फिर्यादी उस्मान हसन शेख यांच्या ८.५ गुंठे जागेवर ‘डायमंड वन’ नावाचा बांधकाम प्रकल्प सुरू आहे. आरोपींनी संगनमत करून काम वेळोवेळी बंद पाडण्याची धमकी देत ते सुरू करण्यासाठी ५० हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर वेळोवेळी रोख व ऑनलाइन पद्धतीने सात लाख रुपये घेतले. आणखी पाच लाख रुपयांची मागणी करून अडीच लाख रुपयांचा चेक जबरदस्तीने घेतल्याचा आरोप आहे.
तसेच, खोट्या ॲट्रोसिटी गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत आणखी खंडणी मागितल्याचेही फिर्यादीने नमूद केले आहे. याप्रकरणी संजय शेंदुरकर, सिद्दीक शेख आणि लक्ष्मण पांचाळ यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.


















