न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहरात कोरोनाबाधिताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बाधितांवर प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत आहे; मात्र, पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती ( वायसीएम ) रूग्णालयातील रक्तपेढीत एकच प्लाझ्मा मशिन असून, कर्मचारी संख्या अपुरी आहे. वारंवार मागणी करूनही आणखी एक प्लाझ्मा मशिन उपलब्ध करून दिले जात नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संजय गायखे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
शहरात प्लाझ्मादान करण्यासाठी अनेक व्यक्ती इच्छुक आहेत. वायसीएममध्ये एकच मशिन असून, प्लाझ्मा संकलनासाठी अधिक वेळ लागत आहे. तसेच, हे मशिन वारंवार बंद पडत आहे.
त्यामुळे नागरिकांना खासगी रक्तपेढीतून चढ्या दराने प्लाझ्माची पिशवी खरेदी करावी लागत आहे. वायसीएम रक्तपेढीत प्लाझ्माची आणखी एक मशिन व आवश्यक प्रमाणात कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी वारंवार केली जात आहे. मात्र, पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गायखे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे















