- नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्या शितल धनंजय वर्णेकर यांची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १३ ऑगस्ट २०२६) :- चिखली येथील म्हेत्रेवस्ती परिसरात चार वर्षीय चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ मध्ये मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्या शितल धनंजय वर्णेकर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देत विशेष मोकाट कुत्रे नियंत्रण मोहीम राबविण्याची मागणी केली आहे.
प्रभाग १२ हा प्रामुख्याने सर्वसामान्य व कामगार वर्गाचा परिसर असून, सकाळपासून रात्रीपर्यंत महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतात. मोकाट कुत्र्यांचा वाढता वावर नागरिकांच्या सुरक्षेसाठी गंभीर समस्या ठरत आहे. अनेकदा कुत्री नागरिकांच्या मागे धावणे किंवा अंगावर येणे यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मोकाट कुत्र्यांबाबत नागरिकांकडून संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या जात असल्या तरी अपेक्षित स्वरूपात ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही वेळा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही फोन न उचलणे किंवा तक्रारींना वेळेवर प्रतिसाद न देणे, ही बाब गंभीर असल्याचे वणकर यांनी म्हटले आहे.
प्रभागातील सोसायट्या, शाळा, अंगणवाड्या, कामगार वसाहती तसेच मॉर्निंग वॉकसाठी नागरिकांची गर्दी असलेल्या परिसरात मोकाट कुत्र्यांचे तातडीने सर्वेक्षण करावे. धोकादायक व आक्रमक कुत्र्यांवर नियमानुसार कारवाई करावी, तसेच निर्बीजीकरण आणि लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवून कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय मोकाट व आक्रमक कुत्र्यांबाबत तक्रार नोंदविण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन क्रमांक सुरू करावा, प्रत्येक तक्रारीला स्वतंत्र क्रमांक देऊन ठराविक कालमर्यादेत संबंधित पथकाने घटनास्थळी पोहोचून कारवाई करणे बंधनकारक करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
मोकाट कुत्र्यांच्या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास नागरिकांना सोबत घेऊन महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही वर्णेकर यांनी दिला आहे. प्रभाग क्रमांक १२ मध्ये विशेष मोहीम, स्वतंत्र हेल्पलाइन आणि तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.


















