न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑक्टोबर २०२०) :- दापोडी ते चिंचवड या पुणे मेट्रोच्या मार्गिकचे जवळजवळ पूर्ण झाले आहे. त्यामुळे रस्ते व दुभाजक पूर्ववत करून सुशोभीकरण करून द्यावे, असे पत्र पिंपरी – चिंचवड महापालिकेने महामेट्रोस पाठविले आहे.
महामेट्रोकडून सुरू असलेल्या पुणे – मुंबई जुन्या महामार्गावरील काम अंतिम टप्प्यात आहे. बहुतांश ठिकाणी सेगमेंटचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे खोदलेले रस्ते व दुभाजक पूर्ववत करून द्यावेत, तसेच दुभाजकांमध्ये चांगल्या दर्जाची रोपे लावून ती सुशोभीत करावीत. पावसाच्या पाण्याची गळती होऊन अस्वच्छ झालेले पिलर स्वच्छ करून घ्यावेत. रस्त्यावर पाणी गळणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना महामेट्रोस पालिका प्रशासनाने दिल्या आहेत.
या संदर्भात बीआरटी स्थापत्य विभागाचे प्रवक्ते विजय भोजने यांनी सांगितले की, मेट्रोचे काम संपत आले आहे. त्यामुळे रस्ते व दुभाजक तसेच, बीआरटी बस थांबे पूर्ववत करून देण्याचे काम तातडीने हाती घ्यावे. हे काम करताना वाहतूक सुरक्षेकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्यावी. शहराच्या सौंदर्यास बाधा पोहचणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना महामेट्रोस देण्यात आल्या आहेत.


















