- ‘ज्येष्ठ नागरिक दिनी’ मोशीतील प्रगतशील शेतकरी सिताराम बारणे यांची खंत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (देि. ०६ ऑक्टोबर २०२०) :- ‘एक ऑक्टोबर’ हा दिवस ‘ज्येष्ठ नागरिक दिन’ म्हणून साजरा केला जातो. ज्येष्ठांच्याप्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस मोशीतील सिल्वर ग्रुपचे संचालक संतोष बारणे आणि कर्तव्यम फाऊंडेशनचे अध्यक्ष राकेश गायकवाड यांनी विविध उपक्रमांनी साजरा केला.
जेष्ठांच्या सन्मानासोबतच त्यांना आनंद देण्यासाठी हा सोहळा आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. मोशीतील प्रगतशील शेतकरी तसेच जेष्ठ नागरिक सिताराम बारणे यांच्या हस्ते परिसरातील उपस्थित जेष्ठांचा सन्मान शाल, श्रीफळ आणि विठ्ठल – रूक्मिणीची मूर्ती देऊन करण्यात आला.
यावेळी जेष्ठ नागरिक काशिनाथ लोखंडे, विश्वास लोखंडे, पोलिस वेलफेअर अध्यक्ष शाम मार्के, इरसेड संस्थेचे पिंपरी चिंचवड शाखा प्रमुख नागेंद्र उमरे, सचिन साके, मंत्रा मुमेंन्टचे मॅनेजर मुकुंद माने यांच्यासह इतर जेष्ठ नागरिक उपस्थित होते. या सन्मान सोहळ्यात जेष्ठांनी हाथरस घटनेचा निषेध केला. तसेच आरोपींना कठोरात – कठोर शिक्षा व्हावी अशा भावना व्यक्त केल्या.
सिताराम बारणे म्हणाले, सध्याचे जग धावपळीचे आहे. संयुक्त कुटुंबपध्दती शहरात क्वचित पहायला मिळते. आई – वडिल नोकरीनिमित्त बाहेर पडल्यावर शहरातील चिमुकल्यांना दुसऱ्याच्या भरोशावर सोडून जावे लागते. त्यामुळे या पिढीला आजी-आजोबांचे प्रेम किंवा संस्कार मिळत नाहीत. याचाच परिणाम म्हणून आजकालच्या पिढीकडून जेष्ठांना सन्मान आणि प्रेमाची वागणूक मिळत नाही. मात्र वृध्दापकाळात दोन शब्द प्रेमाचे आणि चांगली वागणूक प्रत्येक जेष्ठांना मिळणे खूप आवश्यक आहे.
राकेश गायकवाड म्हणाले, जेष्ठ नागरिक हा समाजाचा पाया आहेत. त्यांचे अनुभव युवापिढीला आदर्श नागरिक घडवु शकतात. त्यामुळे जेष्ठांशी प्रेमाणे वागा, त्यांचा सन्मान ठेवा.


















