- जाहीर यादीमध्ये वायसीएमच्या एकाही कोरोना योद्ध्याचे नाव नाही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२०) :- राज्यात कोरोना महामारीच्या काळात असामान्य काम करणाऱ्या डॉक्टर, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य कर्मचाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते १५ ऑक्टोबरला राजभवन मुंबई येथे सत्कार होणार आहे. असामान्य काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. जाहीर झालेल्या नावांमध्ये यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या एकाही कर्मचाऱ्यांचे नाव नाही.
राज्यातील सर्वच विभागांना या पुरस्कारामध्ये प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. राज्यात जेव्हा कोरोनाचा हाहाकार सुरु होता. तेव्हा वायसीएमचा मृत्यूदर हा एक टक्क्यापेक्षाही कमी होता. पिंपरी चिंचवड शहराबरोबरच विभागातील रुग्ण हे वायसीएमला दाखल होत होते. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ येथे रुग्णांना मिळाला आहे. पुणे विभागात सर्वाधिक प्लाझ्मा संकलन आणि वितरण करण्याचे काम वायसीएमने केले आहे. वेळोवेळी वायसीएमच्या कामाचे कौतुक करण्यात आले आहे. मात्र, पुरस्कार देताना या कर्मचाऱ्यांना डावलण्यात आल्याने नाराजी आहे.
पुणे विभागातील १२ कर्मचाऱ्यांना पुरस्कार मिळणार आहे. वायसीएममधील एकाही डॉक्टर, अधिकारी, कर्मचाऱ्याचे पुरस्कारासाठी नाव नसल्याने वायसीएमच्या कर्मचा-यांमध्ये नाराजी आहे.


















