न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२०) :- एका युवकास मारहाण करून ऑनलाईन पैसे खात्यात वर्ग करण्यास भाग पाडल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी चोरट्यास निगडी पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्याच्या नावावरील हा पहिलाच गुन्हा असून, केवळ नऊशे रुपयांसाठी त्याला पोलीस कोठडीची हवा खायला लागली.
प्रवीण कृष्णा अंबिलवाले ( वय २० , आकुर्डी ) याला जबरी चोरीच्या आरोपावरून अटक केली आहे. आकाश युवराज कदम ( वय २२ , आकुर्डी ) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना सात ऑक्टोबरच्या रात्री साडेदहा ते पावणे अकराच्या सुमारास निगडीतील ट्रान्स्पोर्टनगर येथील उद्यानाजवळ घडली.
पोलीस उपनिरीक्षक आर. बी. मोरे म्हणाले, आरोपीवर या पूर्वी कोणताही गुन्हा दाखल नाही. पैशाची गरज असल्याने असे कृत्य केल्याचे तो सांगत आहे. फिर्यादीच्या खात्यात ८८९ रुपये होते. ते सर्व त्यांनी काढून घेतले. पैसे वर्ग करताना आरोपीचे नाव फिर्यादीने पाहिले होते. त्या नावावरुन आणि खात्यावरुन आरोपीस पकडले. त्याचा मित्र संदेश पाटील याला हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच पाटील यांच्या डाव्या डोळ्याच्यावर विटेने मारून जखम केली. फिर्यादी यांच्या खात्यावर असणारे ८८९ रुपये आपल्या खात्यावर वर्ग करण्यास भाग पाडल्याची फिर्याद दिली आहे.















