- विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊनदेखील महावितरणकडून कारवाईस टाळाटाळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी ( १२ ऑक्टोबर २०२०) :- मोशी येथील महावितरण शाखा अभियंता विक्रांत वरूडे यांच्यावर एका महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र विनयभंगाचा फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल होऊनही या शाखा अभियंत्यावर महावितरणकडून कोणतीही कारवाई केली नाही.
या संदर्भात शाखा प्रमुखाला तातडीने निलंबित करून कारवाई करण्याची मागणी छावा क्रांतिकारी सेनेचे पिंपरी – चिंचवड शहराध्यक्ष विजय जरे यांनी महावितरणचे मुख्य अभियंता यांना निवेदनाद्वारे केली आहे. निलंबन न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.
जरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वरुडे यांच्यावर डिसेंबर २०१९ मध्ये महिलेने विनयभंग केल्याची तक्रार पोलिसांकडे दिली आहे. १० डिसेंबर २०१९ या दिवशी गुन्हा दाखल केला आहे. परंतु आजपर्यंत महावितरणने त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. शासकीय नियमानुसार विनयभंग करणाऱ्या कर्मचाऱ्याला तातडीने निलंबित करणे गरजेचे होते ते आपण केले नाही. त्यामुळे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अधिकाऱ्याला सांभाळत आहात असा संदेश यामधून जात आहे. संबंधित महिलेने न्याय मिळावा म्हणून छावा संघटनेकडे विनंती केली आहे. त्यानुसार आपणाकडे आम्ही याबाबत दाद मागत आहोत. पंधरा दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनात दिला आहे.


















